text

मनातील विचार शब्द रूपात मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न.
�� विलास ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. �� Welcome on Vilas Blogs. ��

मन बावरे




काही दिवस झाले मनात काही प्रश्नांनी काहूर माजले होते. आज म्हटल तुमच्याशी बोलाव. मनातल्या प्रश्नांना कागदावर उतरवायच ठरवल, माझ्या वयाच्या मुलींना देखील यासारख्या प्रश्नांनी ग्रासल असेल. तर त्यांना देखील मदत होईल. आपण सुज्ञ वाचक आम्हाला प्रतिक्रिया कळवुन मार्गदर्शन कराल ही अपेक्षा.

मी ऋथ्वी, आपल्या मधीलच एक मराठी मुलगी. वय वर्ष २४ आई — बाबांन सोबत आनंदी जीवन जगतेय. सुशिक्षित घरात जन्माला आलेली मी. मी आणि माझी ताई, आम्ही आमच्या आई — बाबांन सोबत मस्त जीवन जगत होतो. मात्र ३वर्षा पुर्वी ताईच लग्न झाल. ताई आणि माझे जिजू दोघेही इंजिनिअर त्यांचा सुखी संसार चालू आहे. माझी आई शिक्षीका आणि बाबा सरकारी नोकरी करतात. त्यांनी त्यांच्या कष्टाने नांदेड मधुन मुंबईला येवुन हक्काच घर घेतल. आम्ही त्यातच राहतो आम्हा प्रत्येकाला स्वतंत्र रुम हाॅल किचन अस आमच घर. ईतक सर्व नशिबाने मिळत. हे सर्व मला मिळाल आणि म्हणूनच स्वतःला मी भाग्यवान समजते.

भारतीय संस्कृती मुळे आता माझ्या देखील लग्नाची तयारी सुरु झाली. ताई नंतर मी देखील आई — बाबांना सोडुन सासरी जाणार होते. त्याच्यासाठीच विविध स्थळ येवु लागली. मला माझ्या आईने विचारल तुझ कुठे प्रेम वैगरे आहे का ? मात्र मी लहानपणा पासुन आई सोबत वाढलेली, माझी आई सर्वात सुंदर देवाने दिलेली मला देनगी. माझ्या आयुष्यातली मन मोकळ करायची हक्काची जागा. तीला मी सर्वच सांगायची अगदी ४ वर्षापुर्वी काॅलेजला असताना मला एक मुलगा आवडत होता, त्याने मला लग्नासाठी विचारल ते देखील मी आईला सांगितले होते. अगदी शाळा — काॅलेज मधल्या मित्र—मैत्रीणीचे किस्से देखील आईला माहित आहेत. मात्र तरीही आईने मला विश्वासात घेवुन विचारल. माझ्या मनात कोणी नाही त्यामुळे मी देखील सांगुन टाकल अस कोणी नाहीय. आईला त्याच वेळी सांगितल, बाबा आणि तू च्या मुलाशी माझ लग्न लावाल त्याच्याशी मी करेन. मला तुम्ही सुखी समाधानी आनंदी पाहिजे. आज मी हे जग तुमच्यामुळे बघतेय आणि तुम्ही काय माझ वाईट करणार नाही. हे माहित आहे मला. त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय मला मान्य असेल. माझ्या लग्नाची आणि भविष्याची काळजी आईच्या डोळ्यात दिसत होती. शेवटी आई बोललीच तुझे हात पिवळे केले की आम्ही डोळे मिठायला मोकळे. ताई प्रमाणे तुझ देखील कल्याण होवो हीच सदगुरु चरणी प्रार्थना. असे बोलून परमेश्वरा समोर हात जोडून माझ्या सुखाची भीक मागत होती. हे आम्ही माझ्या बेडरुम मध्ये बोलत होतो.

काही दिवसांनी मावशीने आईला फोन केला. बाकी विचारपुस करुन झाली आणि मग माझ्यासाठी कुठे मुलगा बघितला आहेस का ? असे आईला मावशीने विचारल. आपल्यापेक्षा आपल्या नातेवाईकांनाच आपल्या लग्नाची जास्त घाई असते. आई ने सांगितल "नाही गं अजुन कुठे, तुझ्या माहितीत कोण असेल तर सांग". त्यावर मावशीने लगेच तीच्या नात्यात असणार्‍या ऋषिकेश विषयी सांगितल. त्याच देखील इंजिनिअरींग झाल होत. मात्र त्याच लग्न झाल कि नाही हे मावशीला माहित नव्हत. त्याची माहिती घेवुन सांगते अस बोलून मावशीने फोन ठेवला.

पुन्हा चारदिवसांनी मावशीने फोन केला. आईने नेहमी प्रमाणे फोन घेतला. मात्र आज मावशीचा आवाज नेहमी प्रमाणे नव्हता. तीच्या आवाजात आतुरता आणि उत्सुकता जाणवत होती. आज मावशी जास्तच खुश होती. तीने ऋषिकेशच्या नावानेच सुरवात केली. त्याच अजुन लग्न झालेल नाही. त्याच इंजिनिअरींग झाल आहे. त्याला आपण लहान असताना पाहिल आहे. ईत्यादी त्याच्याच विषयी सांगू लागली. खंरच समजत नव्हत तीला आमच्या लग्नाची सुपारी दिली आहे की काय ? आईने सर्व ऐकुन घेतल आणि सांगितल बाबांशी बोलुन सांगते. शेवटी सर्वांची विचारपुस करुन फोन ठेवला. फोन ठेवुन आई माझ्या बेडरुम मध्ये आली, मी आपली नेहमी प्रमाणे लॅपटाॅप मधे पुस्तक वाचत होते. आई माझ्या शेजारी येवुन बसली. मी ओळखल आईला माझ्याशी काहितरी बोलायच आहे. मात्र आईला कस बोलाव ते समजत नव्हत. मी देखील शांतपणे लॅपटाॅप बंद करुन ठेवला आणि आईला बोलले "बोल काय बोलायच आहे". त्यावर आई एकदम दचकली. ती फक्त शरिराने माझ्या शेजारी बसली होती मनाने मात्र माझ्या लग्नानंतरचा विचार करत होती. आई बोलली "कुठे काय ? काही नाही मला बोलायच. तुला कोणी सांगितले मला बोलायच आहे म्हणुन" त्यावर मी तिला स्माईल करुन बोलली " अग तुझा चेहरा सांगतोय." ती हसली आणि म्हणाली काहीहा ! मग मी म्हटल "अग तू आई आहेस तू आमच्या मनातल ओळखतेस. आम्हाला नाही कधी जमल तुझ्या मनातल ओळखायला. मात्र आज तु ज्याप्रमाणे येवुन बसलीस अगदी तशाच प्रकारे, मी तुझ्या जवळ येवुन बसते.
बोलायच असत मात्र हिम्मत होत नाही तेव्हा मी पण अशीच बसते. त्यावेळी तू मन ओळखतेस आणि माझ्या मनातल काढुन घेतेस." "सांग आज तुझ्या मनात काय आहे ते सांग, काय बोलायच आहे माझ्याशी बोल. नको कसला विचार करु. तुला तुझ्या मुली जवळ बोलता येत नसेल तर मी तुझी मैत्रीण समजून बोल."  आई सांगू लागली मावशीचा फोन आला होता आणि मावशी त्या ऋषिकेश विषयी सांगत होती. मावशीने आईला जे सांगितले ते आईने सर्व मला सांगितल. त्यावर आई बोलली " तुला पटत असेल तरच आपण बांबांन जवळ बोलू. अजुन विचार कर आणि मला सांग".  आई इतक सर्व बोलत असताना देखील रडत होती. मी आईला बोलले " मी नको म्हटल तर लग्न लावणार नाही का ? आज ना उद्या लग्न करुन पाठवणारच ना ! मग मी अजुन काय सांगू . तुम्हाला जे वाटत ते करा. तुम्ही कराल ते मला मान्य असेल." असे बोलून नकळत आम्ही दोघी घट्ट मिठी मारुन रडु लागलो. त्या क्षणाला काय झाल माहित नाही मात्र आम्हाला आमचे अश्रु थांबवता आले नाही.


रात्री आईने बाबांनां सर्व माहिती दिली. बाबांना देखील त्याच शिक्षण आणि त्याच कौटुंबिक माहिती ऐकून तो योग्य वाटला. दुसर्‍या दिवशी मी सकाळी नेहमीप्रमाणे तयारी सुरू केली. तयार होऊन बाबांना आवाज देवुन आॅफिसला निघत होते. त्यासाठी मी त्यांच्या बेडरुम मध्ये गेले. नेहमी झोपलेले असतात मी त्यांना झोपेतून जागे करूनच बाहेर पडते. आज मात्र ते नेहमी प्रमाणे झोपले नव्हते.  त्यांना पाहताक्षणीच मला समजले आज त्यांची झोप पूर्ण झाली नव्हती. त्यांचे ते लाल डोळे पाहून मला वाटले त्यांची तब्येत ठीक नाही. मी त्यांच्या शेजारीच बसले आणि विचारल तुम्हाला ठीक वाटत नाहीय का ? रात्री झोप झाली नाही वाटत अस बोलले. त्यावर त्यांनी एक स्माईल देवून माझ्या पासून चेहरा लपवला आणि मला बोलले जा ! तुला उशीर होईल तू जा, मी ठीक आहे. असे बोलून बाबांनी माझ्या पासुन तोंड उशीत लपवल. मी पुन्हा पुन्हा उठवत होते मात्र शेवटी बाबांनी वरच्या स्वरात बोलले मी ठिक आहे तू जा आॅफीसला तू किती दिवस आमच्या सोबत राहणार आहेस. हे शब्द ऐकताच माझ्या डोळ्यात पाणी आल. मी आॅफिसला जायच सोडून मी माझ्या बेडरुम मध्ये गेले. दरवाजा लावुन घेतला आणि बेडवर उशीला धरुन खुप रडले. थोड्यावेळाने आई साफसफाई करायला माझ्या बेडरुम जवळ आली. त्यावेळी तीला दरवाजा बंद दिसला. ती उघडण्याचा प्रयत्न करत होती मात्र मी बंद केला होता. तीला नेमक समजत नव्हत माझ्या रुम मधे कोण आहे ते. मी आतमधे असल्याचे समजले. थोड्यावेळाने मी दरवाजा उघडला. आई ने विचारल आॅफिसला का गेली नाहिस. त्यावर मी बोलले " मला जायची ईच्छा नव्हती  मी नाही गेली."
आई "अग पण सकाळी उठुन ईतकी तयारी केलीस !"
मी "हो केली मग काय झाल. प्लीज मला एकटीला शांत बसु दे"
अस बोलून मीच आई वर रागवले तीला देखील दुखवल ती शांत पणे माझ्या रूममधून निघुन गेली. थोड्यावेळाने बाबा  कामावर गेले जाताना त्यांनी आईला बजावले मला त्रास देऊ नकोस अस सांगून गेले, माझ्या रुममधे येवून, माझ्या गालावरून प्रेमाने हात फिरवून स्वतःच्या हाताच चुंबन घेवुन निघाले. त्यांना वाटत होते मी झोपली आहे मात्र मी जागी होते. बाबा माझ्या जवळुन निघता क्षणी मी बेड वरुन उठुन बाबांना मागुन घट्ट मिठी मारून बोलले मला लग्न करून तुम्हाला सोडून नाही जायचं.... ऋथू मी आॅफिसला जावू की तुझ्या सारखा मीही घरी थांबू. " ऋथू" अस बाबा मला प्रेमाने बोलतात. मी डोळे पुसत बाबांना कामावर जायला सांगितल. बाबांनी मला शब्द दिला मी संध्याकाळी लवकर येयीन मग आपण  बाहेर कुठेतरी जावू. तू विचार करुन ठेव कुठे जायच. अस सांगुन आॅफिसला निघुन गेले.

संध्याकाळी मला कमिट केल्याप्रमाणे बाबा लवकर आले. मला वाटत होतं बाबा लवकर येणार हे फक्त मलाच माहित आहे . हे आम्हा बाप—लेकीच ठरल आहे. बाबा लवकर आलेले पाहुन आईला आश्चर्य वाटले. आई बाबांना, "लेक घरी तेव्हा आज बरे लवकर आलात". मी, आईला "हो मग काय, मला माहित होत आज माझे बाबा माझ्यासाठी लवकर येणार आणि आम्ही फिरायला देखील जाणार आहोत पण आम्ही तुला देखील घेवुन जावु ! हो ना बाबा आईला पण नेऊया ?
बाबा, " बघ तू म्हणत असशील तर नेवु."
मी लाडात, " हा बाबा ठिक आहे नेऊया आपण, उगाच तीला वाईट वाटेल नाहितर,नाही नेल तर तुमच्या सासर्‍या जवळ आपली तक्रार करेल. अशी मस्करी करुन आईला रात्रीच जेवन करु नको म्हणुन सांगितल."
त्यानंतर आम्ही तिघे गाडी घेवुन फिरायला निघालो. आज बाबांनी गाडीची चावी माझ्याकडे दिली. बाबा बाजुला बसतात तेव्हा मी गाडी चालवते. आज बाबा सोबत होते मात्र आई — बाबा दोघेही मागे बसले होते. मी बाबांना सांगत होते. माझ्या बाजुला बसा पण बाबांना बसायच नव्हत, मला भिती वाटते तुम्ही याना ! अशी विनंती केली तरी बाबा आले नाहीत. बाबा, मला " आई रागवली आहे तीचा रांग दुर करतो, तू गाडी चालव मी आहे मागे. नको घाबरु. असा आत्मविश्वास दिला." आई देखील रागवल्याच नाटक करत होती.
ते आज नेहमी पेक्षा वेगळे वागत होते. काहितरी बदल आहे हे समजत होत मात्र तो बदल का आहे ते माहित नव्हत ते आज असे का वागतायत समजत नव्हत. दोघे पण मागे बसुन माझाच विचार करत होते. एकमेंकाशी नबोलता मला मागून गाईड करत होते. भल तेे माझ्यापासुन लांब बसले होते मात्र जीव माझ्यात अडकला होता. आम्ही एका गार्डन मधे गेलो. मी ते बघताच गाडीतून उतरुन गार्डन मध्ये पळत गेले. त्या सुंदर हिरवळीवर लोळण्याचा मोह झाला मात्र स्वतःवर ताबा ठेवला आणि आपण आता मोठे झालो आहोत अस मनाला समजवल. त्या हिरवळीवर लहान मुल खेळत होती अनेक लोक बसुन गप्पा मारत होते. मी हि त्याहिरवळीवर बसले मागून आई आली ती माझ्या शेजारी बसली. बाबा पिण्यासाठी पाणि आणायला गेले होते. थोड्यावेळात ते देखील आले. आणि आई शेजारी बसले, जे की, मला अजिबात आवडले नाही. माझे बाबा, माझ्याच जवळ बसले पाहिजे. तिथे आई बाबा एकत्र मला थोड अंतर देवुन. जणू काय त्यांच नवीनच लग्न झालय. आता मी रागाने बाबांना " अजुन तुमची बोयको रागवली आहे का ?" आणि मी उठुन बाबांच्या शेजारी जावुन बसले. थोडावेळ गप्पा मारत होतो  आणि त्यानंतर आम्ही हाॅटेल मधे जेवायला गेलो. आता मात्र बाबांनी स्वतः गाडी घेतली होती. हाॅटेल समोर आम्हाला उतरवुन बाबा गाडी पार्क करायला गेले. तो पर्यत आम्ही आत जावुन बसलो. बाबा आले आणि आताही ते आई शेजारी बसले.
त्यावेळी आईने सांगितल, बाबांनी आॅफिसला जावुन तीला फोन केला होता. आणि ते दोघ जे काहि नेहमी पेक्षा वेगळे वागत होते ते ठरवुन वागत होते. आयुष्यात साथीदाराच महत्व काय असते ते पटवुन देण्यासाठी. शेवटी आई बाबांनी मला समजवल. आईने माझ्या समोर पुन्हा एकदा ऋषिकेश चा विषय काढला. अगोदर ही बाबांना त्याच्या विषयी सांगितल होत. बाबांनी मला विचारल तुला चालेल ना ? की तुला दुसरा कोणी माहित असेल तर त्याच्या विषयी सांग आपण त्याचा विचार करु. त्यावर मी," बाबा तुम्ही ज्या मुलाशी लग्न लावाल त्याच्याशी डोळे बंद करुन लग्न करायला तयार असेन. माझा स्वतः पेक्षा तुमच्यावर जास्त विश्वास आहे. तुम्ही माझ वाईट करुच शकत नाही. आई बाबा तुम्ही फक्त सांगायच मी स्वतःचा जीव देखील देयला तयार असेन...." जेवण करुन आम्ही घरी परतलो.

आई बाबांनी विचार करुन त्या पाहुण्यांशी बोलायच ठरवल. त्याप्रमाणे मावशीला आईने सांगितल. काही दिवसांनी मावशीच्या घरी भेटायच ठरल. मावशी गावी राहत होती आणि गावची घरे विस्तृत. ठरल्याप्रमाणे आम्ही १दिवस अगगोदरच गावी गेलो. आम्ही सुरवातीला मामाच्या गावी गेलो. आईने आजी आजोबांना सांगितले. त्यांचे आशिर्वाद घेवुन आम्ही सकाळी मावशीच्या घरी निघालो. जाताना माझ्यामनात खुप प्रश्न निर्माण होत होते, लग्न कस होईल ? कुठे होईल ? तो कसा असेल ? मला समजुन घेईल की नाही ? मला आई बाबांना भेटता येईल की नाही ? इत्यादी प्रश्न माझ्या मनात येत होते.... ते सर्व प्रश्न डोक्यात असतानाच आम्ही तेथे पोहचलो, मावशीच्या घरी आम्ही येणार म्हणून थोडी धावपळ होती. संध्याकाळी पाहुणे येणार निश्चित झाल. खुप दिवसांनी आम्ही भेटलो होतो. दुपारी आम्ही जेवण करुन गप्पा मारत बसलो होतो. मात्र आम्ही इतक्या दिवसांनी भेटुन सुद्धा आई बाबा त्यांच्यात मिसळत नव्हते. त्यांच्या जिवाला घोर लागला होता. माझ्या प्रमाणेच त्यांच्याही मनात अनेक प्रश्न येत असणार. मावशी माझी तयारी करत होती. मला समजवत होती. घाबरायच नाही, बिंनधास्त बोलायच, तुझ्या मनात काय विचारायच असेल ते विचार ईत्यादी मला सांगत होती... घरा बाहेरुन एखादी गाडी गेली तरी जीव खाली वर होत होता. गाडीचा आवाज ऐकुन पाहुने तर आले नसतील ना ? असे प्रश्न पडत आणि तितका जीव घाबरत होता...

संध्याकाळी ठरल्या प्रमाणे ४.३०च्या आसपास पाहुणे आले. मी तयार होवुन बसले होते. बाबा, काका बाहेर गेले आणि पाहुण्यांना घरी घेवुन आले. बैठकीच्या खोलीत बसण्याची व्यवस्था केलेली होती. थोड्यावेळ ओळख करुन अनौपचारिक गप्पा मारत बसले होते. काहि वेळाने औपचारिक बोलनी सुरु झाली.... मुलगा मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला.... त्यांनी मला काहि प्रश्न विचारले माझ्या बाबांनी देखील त्यांना काहि प्रश्न विचारले... ते घरी जाणार इतक्यात ऋषिकेशच्या बाबांनी माझ्या बाबांना विचारल," तुमची काही हरकत नसेल तर त्या दोघांना बोलायला ५ मी. देवुया का ? आज २१व्या शतकात...... " त्यामुळे माझे बाबा देखील तयार झाले.

आम्ही दोघ मावशीच्या गॅलरी मध्ये गेलो. आम्ही दोघेही सुरवातीला शांत उभे होतो. तो मला न्याहळत होता मी मात्र मान खाली खालून उभी होते. बोलायच दोघांनाही होत मात्र सुरुवात कोणी करत नव्हत. शेवटी त्यानेच  बोलायला सुरवात केली.
तो," कस बोलायच समजत नाहीय, मी काय कवी नाही, त्यामुळे मी डायरेक्टच बोलतो." अस बोलून त्याने सुरुवात केली.

तो, "तुम्ही कुठे मुंबईत कुठे राहता ?"

मी, कल्याण.

तो, तु स्वतः लग्नाला तयार आहेस ना ?  कोणी जबरदस्ती नाही ना करत. तुला आई बाबांना सोडुन माझ्यासोबत कायमच गावी राहव लागेल चालेल का तुला ? "

मी," मी होकारार्थी मान हालवली. मी पुढे शिक्षण घेतल तर चालेल ना ? मला नोकरी करायला आवडेल पण तुमची परवानगी असेल तर बर होईल."

तो," तुला अजुन किती शिकायच आहे. ईतक शिक्षण बस, अजुन शिकुन काय करणार ? घरची कामे कमी आहेत का ? नोकरी करायला.

अशी आमची चर्चा चालू होती... त्यातच तो म्हणाला, आपण ईतक्या लांब राहतो तर प्रत्येक सणाला माहेरी जाता येणार नाही.
आणि होऊ नये पण जर कधी आई वडीलांच बर वाईट झाल तर ईतक्या लांब लगेच घेवुन जाईन अस नाही. माझ्या आई बाबांनी पाठवल तर तू जावू शकतेस मात्र मी काम धंदा सोडुन येणार नाही.
हे सर्व ऐकून त्याची किव येत होती त्याची मान दाबावी वाटत होती. त्याच्याशी लग्न करायची ईच्छाच उठाली.

ईतक बोलुन त्याच मन शांत होत नव्हत तो पुढे बोलू लागला,

तो," मला मनात ठेवण्यापेक्षा स्पष्ट बोलन आवड. जे आहे ते आहे. अस बोलून बोलू लागला.
माझ एका मुलीवर प्रेम आहे, मात्र ती वेगळ्या जातीची आहे. त्यामुळे  आमच लग्न कधी शक्य नाही . मात्र तीला मी कधी विसरु शकणार नाही.
हे सर्व ऐकून मला धक्का बसला, माझ ज्या मुलासोबत लग्न होणार त्या मुलाच दुसर्‍या मुलीवर प्रेम. आणि तेही मला माहित असताना मी कस लग्न कराव.
तो मला समजवत होता हे माझ्या घरी माहित आहे पण त्या मुलीशी शक्य नाही म्हणुनच माझ्यासाठी मुलगी शोधत होते. त्यात तू आलीस विचार केला हे सर्व मनात ठेवुन आज ना उद्या समजणार त्या पेक्षा तुला आत्ताच सांगाव. म्हणुन सांगितल.

ईतक सर्व बोलून झाल्यावर त्याच्याशी लग्न करायच नाही हे मी ठरवल. मात्र प्रश्न होता माझ्या आई बाबांना काय सांगाव  ?
तुमच्या मृत्यु नंतर मला पाठवणार नाही की तुम्हाला बघायला घेवुन येणार नाही काय सांगाव मी माझ्या आई बाबांना ??? ते त्याचे शब्द कानात गरम तेल ओतल्या सारखे होते. माझ्या कानात फक्त ते शब्द वाजत होते आणि मी मात्र रडत होते....

??✍ विलास अशोक जाधव

5 comments: