text

मनातील विचार शब्द रूपात मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न.
�� विलास ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. �� Welcome on Vilas Blogs. ��

एक पाखरू भरकटलेलं 🦋

रामपूर गावात मोहन राहत होता. १२वी चांगल्या गुणांनी पास झाला होता. त्याचे वडील एका कंपनी मध्ये कामाला होते. आपल्या घरासाठी डबल शिफ्ट तर कधी अधिक वेळ थांबून काम करत असत. इतरांप्रमाणे आपली देखील मुलं चांगली शिकावी, आपलं नाव करावं म्हणून झटत होते. जेवढं जमेल तितकं मुलांसाठी आणि आपल्या घरासाठी करत होते. १२वी पर्यंत आपल्याच गावातील कॉलेज मध्ये मुलाला शिकवलं होतं , परंतु पुढील शिक्षणासाठी जिल्ह्यातील नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजची फी भरायला पैसे नव्हते म्हणून त्यांनी त्यांच्या मित्राकडून पैसे घेऊन आपल्या लेकाचं म्हणजेच मोहनच ऍडमिशन घेतले. नवीन कॉलेज आणि इतकं प्रतिष्ठित कॉलेज म्हणून दोन नवीन शर्ट घेऊन दिली. आपल्या मुलाला कोणी हसू नये. त्याला वाईट वाटू नये म्हणून जमेल तसं करत होते.

मोहन कॉलेजला जाऊ लागला. आता त्याच्यासाठी वह्या पुस्तके नोट्स घ्यावी लागतील म्हणून आईने शेजारी राहणाऱ्या परबांकडून पैसे घेऊन आणले आणि मोहनच्या वडिलांना देऊन मोहनसाठी लागणाऱ्या वस्तू आणायला सांगितले. आईला देखील वडिलांची अवस्था समजत होती ;  परंतु मुलगा आईकडे हट्ट करत होता. आणि लोकांसमोर आपल्या मुलाला कमी वाटू नये म्हणून त्याचे आई-बाबा त्याच्यासाठी राबत होते. आता मोहनला सर्व अत्यावश्यक वस्तू आई बाबांनी घेऊन दिल्या होत्या.

कॉलेज मध्ये विविध कार्यक्रम होत होते त्या त्या वेळी आई बाबा पैसे देत होते. वर्गातील मुलं स्कुटर बाईक घेऊन कॉलेजला जातात म्हणून मोहन देखील हट्ट करू लागला. बाबांना बाईक घेणं शक्य नव्हते. तरी त्यांनी कंपनीच्या मालकांकडून पैसे घेऊन सायकल आणली . ती त्याला आवडली नाही. तो चिडचिड करु लागला . "मला कधीच काही घेऊन देत नाही, ना सहलीला पाठवत, ती बाकीची मूल बघा ८ दिवसासाठी कुलू मनालीला जाऊन आली . तुमचं माझ्याकडे लक्षच नाही." अस खूप काही आई- बाबांना बोलला. आईने न रागवता समजावलं. बाबांकडे पैसे नाहीत आपण किती जणांनकडून पैसे घेतले आहेत आणि कसं घर चालवतो ते सांगितले.

काही दिवसांनी कॉलेज मधून प्रत्येकाला प्रकल्प तयार करायला सांगितले. वर्गातील मुलं आपापल्या परीने मोबाईलवर तर काहीजण लॅपटॉप वर इंटरनेटच्या मदतीने प्रकल्प करत होती. मात्र मोहनकडे मोबाईल नव्हता त्याच्या बाबांकडे होता पण तो साधा. महागडा मोबाईल घेण्याची ऐपत नव्हती.

 मोहन ने बाबांकडे हट्टच केला "मला उद्याच्या उद्या नवीन मोबाईल पाहिजे तो पण इंटरनेट वगैरे चालेल असा ". पण बाबांना असा मोबाईल घेणं आता शक्य नव्हतं. बाबांनी समजावलं "आपण घेऊ मोबाईल अगदी तुला पाहिजे तसा घेऊ, पण आता मला काही जमणार नाही, आपण लवकरच घेऊ. मी तुला शब्द देतो लेका तुला एका महिन्यात मोबाईल घेऊन देईन." मोहनची आई , "अहो ! जे नाही शक्य तर उगाच कशाला त्याला आशेवर ठेवताय."  पण बाबांनी शब्द देऊन देखील मोहन ऐकायला तयार नव्हता. मोहन बाबांना बोलला, " तुम्हाला माझ्या शिक्षणाची काळजीचं नाही." वगैरे - वगैरे खूप काही बोलला." बाबा इतकं करत असताना देखील तो बाबांना असं बोलत होता ते बाबांना सहन झालं नाही.

 आईला येतो म्हणून सांगून बाबा गप्प घरातून गेले, आणि एका देवळात जाऊन कोपऱ्यात बसून रडू लागले. आई देखील घरात आपलं काम करत होती. मोहनचा राग अनावर झाला होता, अस्वस्थ वाटत होतं, घरात राहून आपल्याला प्रगती करता येणार नाही, अस वाटू लागलं आणि म्हणून घरातले पैसे घेऊन तो निघून गेला. बाबा थोड्या वेळाने मन शांत झाल्यावर घरी आले. घरी येऊन बघतात तर मोहन घरात नव्हता, मोहनच्या आई जवळ विचारपूस केली मात्र तिला देखील काही कल्पना नव्हती. आई - बाबा दोघंही रात्रभर शोधत होते मात्र मोहन काही भेटला नाही.

मोहनच्या खिशात काही पैसे होते, त्याच्यामुळे तो पहिले दोन दिवस मस्त हॉटेल मध्ये राहिला. मनासारखं जे पाहिजे ते घेऊन खात होता. बिनधास्त पैशाची उधळपट्टी करत होता. आपला जिल्हा सोडून अगदी शहरात आला. मुंबईत येऊन जिवाची मुंबई करत होता. शेवटी पैसे संपले आणि राहायला जागा आणि खायला अन्न कोणी देईना झाले. शेवटी त्याने एका दुकानाच्या पायरीवर रात्र काढली. उपाशी झोप लागत नव्हती मात्र सकाळच्या प्रहारी झोप लागली.



सकाळी नेहमी प्रमाणे साफसफाईसाठी BMC कामगार आले, आणि त्यांनी त्याला उठवले.

दुसऱ्या दिवशी पुन्हा दिवसभर पोटासाठी फिरत होता. पण काही मिळाले नाही शेवटी रात्री एका रस्त्याच्या शेजारी बसला. दोन दिवस उपाशी राहिल्यावर आई-बाबांची आठवण झाली. पण घरी जायला पैसे नव्हते. पैसे नसताना पण जायची तयारी होती, पण आता कुठे आहोत आणि तिथून घरी कसं जायचं हे समजतं नव्हतं. शेवटी तिथेच रडत बसला होता. त्याच रस्त्याने एक कार घेऊन एक गृहस्थ जात होता. त्याने त्याला पाहिलं, गाडी थांबवली आणि रस्त्याच्या बाजूला उभी केली आणि त्याच्या जवळ आला. त्या गृहस्थाचे नाव नरेश. त्या नरेशने त्याला विचारलं, बाळा काय झालं ? का रडतोयस ? मोहन ने सांगितले, मला भुक लागली आहे, दोन दिवस मी काही खाल्ले नाहीय. नरेशने पुढे विचारल, कुठुन आलास ? तुझे आई-बाबा कुठे आहेत ? तू एकटा ईथे कसा ? मोहनने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. नरेशने त्याला जेवण देतो सांगून त्याला गाडीत बसायला सांगितले.


 नरेशने त्याला एका वडापावच्या दुकानांत नेलं. त्याला वडापाव घेऊन दिला. भुकेने व्याकुळ झालेल्या मोहनने पटापट वडापाव संपवला देखील. पण दोन दिवसाची भुक ती एका वडापावाने काय होणार. नरेशने विचारल अजुन वडापाव पहिजे का ? भुकेने व्याकुळ झालेला तो, त्याने होकारार्थी मान हलवली. नरेशने अजुन एक वडापाव घेऊन दिला. आता जरा मोहनला बरं वाटत होतं. मोहनने हात जोडून त्यांचे आभार मानले. त्यांना धन्यवाद दिले. आणि म्हणाला साहेब तुम्हचे खरंच खूप उपकार झाले. माझ्याकडे तुम्हांला द्यायला पैसे पण नाहीत. मी तुमची गाडी साफ करून देऊ का ? त्यावर नरेश म्हणाला राहूदे रे. आता तू कोठे जाणार आहेस ? असं कोठे राहणार ? चल येतोस माझ्याकडे ?

मोहनने विचार केला, साहेब (नरेश) खूप मोठा माणूस आहे , आपण असं रस्त्यावर राहण्यापेक्षा नरेश सोबत गेलेल बरं असा विचार करुन नरेश सोबत जायला तयार झाला .
नरेश त्याला आपल्या घरी घेऊन आला. रात्री शांतपणे मोहन झोपला. मात्र नरेशला झोप लागत नव्हती त्याने त्याच्या मित्राला फोन केला आणि दुसऱ्या दिवशी भेटण्याची वेळ निश्चित केली. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांनीही नाश्ता केला. काळजी असल्याप्रमाणे नरेशने मोहनला सांगितले आज आपण Dr. कडे जाऊन येऊया तुला रात्री ताप होता . तू शांत झोपला होतास त्यामुळे तुला माहीत देखील नाही. नरेश मोहनला Dr. कडे घेऊन जातो सांगून त्याला निर्जन ठिकाणी घेऊन गेला . त्याठिकाणी नरेश चे ४ मित्र आगोदरच हजर होते . त्यांनी ठरवल्याप्रमाणे मोहनला गुंगीचे इंजेक्शन देऊन त्याचे डोळे , १ किडनी काढली , १ हात, १ पाय कापला. आणि काही दिवसांनी त्याला देखील रेल्वे स्टेशन वर भीक मागायला बसवले. मोहन सारख्या अनेक मुलांना नरेशने भीक मागायला लावलं होतं. मोहनला प्रगती करायची होती ऊंच भरारी मारायची होती , पण सर्वच गमावून बसला.
मोहनचं आयुष्य हे तुटलेल्या पतंगाप्रमाणे झालं होत.


 एकदा पतंग तुटल की ते कुठे जाऊन पडेल हे त्या पतंगाला देखील माहित नसतं, चिखलात जाऊन पडेल की उंच झाडावर लटकत असेल की दुसराच कोणी ते पतंग पकडून आपल्या मनाप्रमाणे उडवेल ते त्या पतंगाला देखील माहित नसतं, की त्या पतंगाच अजुन काही वेगळं होईल ते त्या पतंग उडवणार्‍याला देखील माहीत नसतं.
जर उंच उडायचं असेल तर त्या पतंगाला त्या धाग्यापासून वेगळ होऊन चालणार नाही.

असच असत मुलांनो, "तुम्हाला उंच भरारी घ्यायची आहे, तर आई-बाबांपासून वेगळ होऊन चालणार नाही. त्यांच्या आशीर्वादाशिवाय तुम्ही यशस्वी होणार नाही. तुम्हांला उंच भरारी घ्यायची असेल तर त्यांच्या सोबत घ्या. नाहीतर अवस्था तुटलेल्या पतंगा सारखीच होईल."

"पतंगाला भरारी घ्यायची आहे, तर मांज्याला (धाग्याला) सोडून चालणार नाही."

2 comments: