text

मनातील विचार शब्द रूपात मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न.
�� विलास ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. �� Welcome on Vilas Blogs. ��

प्लीज परत ये ना एकदा....

 

तो बसची वाट बघत उभा असतो. बस आल्यावर बसमध्ये चढतो आणि टिकीट काढतो. बस चालू झाली आणि तो आठवणीच्या प्रवाहात मागे वाहू लागला. त्यावेळी तो ऑफिसला जायचा. रोजचा त्याचा प्रवास बसने होयाचा. तेव्हा ती हि त्याचवेळेची बस पकडायची. अशीच रोजची त्यांची झालेली ओळख मैत्रीच्या रुपात हळूहळू खुलत होती. अशाच एके वेळेस ती थोडी उदास वाटली. त्याने तिला विचारलं... "काय गं काय झालं आज अशी उदास का वाटतेस तू?" ती म्हणाली, काही नाही रे उद्या सकाळी आम्ही ५, ६ दिवसांसाठी गावी लग्नाला जाणार आहोत.. त्याने तिला विचारलेले कि तू उदास का वाटतेस पण हे ऐकून तो स्वत: पण उदास झाला होता.

पण त्याला आनंदही झाला होता कि ती आपल्यासाठी उदास झाली आहे. तो तिला म्हणाला, "अगं मग उदास होण्याचे काय कारण आहे त्यात?" ती म्हणाली, अरे मी ५, ६ दिवसांसाठी जाणार आहे आणि आता आपण ५, ६ दिवस.... असं म्हणून तिने तिचे शब्द आवरले. जाऊ दे... तुला काहीच वाटत नाही आहे ना ? तो म्हणाला, मला... मला कशाला काय वाटेल ? किती आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही गावाला जावा आणि लग्न Enjoy करा... त्याला तिच्या मनात काय चालू आहे हे जाणून घ्याचे होते.
       चेहऱ्यावर खोटे हास्य दाखवून ती त्याला म्हणाली, चल बाय माझा स्टॅाप आला. ती तिच्या डोळ्यातील पाणी लपवण्यासाठी त्याच्या नजरेला नजर देत नव्हती. तो हि खूप उदास झाला होता. पण जाता जाता तिचा हसरा चेहरा पाहावा म्हणून तो आनंदाच अवसान आणत म्हणाला, "Happy Journey" ती हसली पण अश्रू लपवत होती आणि ती बसमधून उतरली. दुसऱ्यादिवशी त्याचे ऑफिसला जायचे मन नव्हते. घरी राहून तिचीच आठवण येईल. ऑफिसला गेल्यावर कामात वेळ तरी निघून जाईल म्हणून तो ऑफिसला जायला निघतो. तसा तो फारच उदास असतो. तो बसस्टॅापवर जातो आणि पाहतो तर काय... ती बसस्टॅापवर उभी असते. त्याला आनंदही होतो पण स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. तो तिला विचारतो, "अगं तू लग्नाला जाणार होतीस ना ?" ती म्हणते, "नाही गेली रे"... का? गं.. असचं नाही जावसं वाटलं म्हणून नाही गेली.. त्या क्षणी त्याला असं वाटतं कि ती आपल्यासाठीच नसेल गेली. त्याला खूप आनंद झाला होता. बस आली दोघे बसमध्ये चढले तो तिला पाहतच बसला होता. ती मात्र शांत बसली होती. असेच दिवस उलटत गेले. तिचं नंतर बसस्टॅापवर येणे कमी झाले होते आणि आली तरी शांत असायची. काही बोलायची हि नाही. त्याने अनेकदा तिला शांत राहण्यामागच कारण विचारलं पण काही नाही असं बोलून तिने ते टाळले. त्याला नंतर असे वाटू लागले कि "तिला माझ्याकडून तिच्यावरच्या प्रेमाची कबुली पाहिजे असेल".. मला जे तिच्याबद्दल वाटते तेच तिलाही माझ्याबद्दल वाटत असेल कदाचित....

     तिचा वाढदिवस येत होता त्याने ठरवलं तिच्या वाढदिवसाच्यादिवशी मी तिला सांगून टाकीन माझ्या मनातलं... तो तिला सांगतो तुझा वाढदिवस येतोय तेव्हा आपण कुठेतरी जाऊया का ? ती बोलते... ठीक आहे जाऊया... तिचा वाढदिवसाचा दिवस येतो. दोघे बसस्टॅापवर न भेटता दुसरीकडे भेटतात. तो तिच्यासाठी गुलाबाच्या फुलांचा गुच्छा घेऊन जातो. ती समोर येते. तो तिला म्हणतो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... आज खूप सुंदर दिसतेस तू... ती लाजते आणि Thank You बोलते.. तो तिला म्हणतो, आदिती मला तुला काही तरी सांगायचं आहे. ती म्हणते, सांग ना.. तो म्हणतो, "आदिती माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे" आणि फुलांचा गुच्छा तिला देतो. ती त्या फुलांचा गुच्छा घेते आणि म्हणते "आदित्य माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे".. आदित्य तिला म्हणतो, तू माझ्याशी लग्न करशील का ? आदिती त्याला म्हणते नाही.. का ? गं प्रेम करतेस मग लग्न का नाही करणार ? ती खाली मान घालते आणि त्याला म्हणते नाही करू शकणार आणि तिकडून निघून जाते. तो तिचा हात पकडतो पण ती हात झटकून तिकडून निघून जाते. तो विचारात पडतो. का आदिती अशी वागली ? लग्नासाठी होकार का नाही दिला. जर असंच करायचे होते मग प्रेमही का केले माझ्यावर.. त्याच्या मनात अनेक प्रश्न येत होते. त्याची उत्तरे त्याला तिच्याकडून पाहिजे होtती. तो तिच्या मागे मागे जातो पण ती त्याला दिसत नाही. तो खूप उदास होतो. त्याचे डोळे पाण्याने भरून येतात. नंतर तो घरी जातो.  

    दुसऱ्यादिवशी तो बसस्टॅापवर जातो पण ती येत नाही. असेच ४,५ दिवस निघून जातात. ती येतच नाही. तो ती का येत नाही हे बघण्यासाठी तिच्या घरी जातो. तिने तिच्या घरचा पत्ता त्याला आधीच सांगितलेला असतो. तो तिकडे जातो आणि तिकडे जाऊन त्याला शॅाकच लागतो. तिकडे गेल्यावर तिच्या फोटोला हार लागलेला असतो. तो तिच्या घरच्यांना विचारतो हे काय हिच्या फोटोला हार का लावला आहे ? तेव्हा तिचे घरचे बोलतात आम्ही २ महिन्यापूर्वी लग्नाला जात असताना आमच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यात आम्ही जखमी झालो पण आदितीचा तिकडेच मृत्यू झाला. हे ऐकून तो बोलतो कि हे असे कसे होईल आदिती तर ४,५ दिवस झाले फक्त आली नाही आहे म्हणून मी तिला पाहण्यासाठी इकडे आलो आहे. घरातल्यांना असं वाटत कि हा वेडा आहे कोण तरी ? ते त्याला बोलतात कि हेच सत्य आहे. तो जोरात आदिती असं ओरडतो आणि खालीच बसतो. तेवढयात बसचा ब्रेक लागतो आणि तो भानावर येतो. आज त्या गोष्टीला ५ वर्षे झाली. तरीही त्याच्या डोळ्यातून अश्रू निघत असतात तो ते अश्रू फुसतो. बसमधून उतरतो. त्याला असे वाटत होते. माझ्या प्रेमाची कबुलीच तिला माझ्यापासून दूर घेऊन गेली, "ती केवळ माझ्या प्रेमाच्या कबुलीसाठीच मृत्यूनंतर देखील परत आली होती." " जर त्या दिवशी मी तिला माझ्या प्रेमाबद्दल सांगितलं नसतं तर"... पण तेच ऐकायला तर तिचा जीव माझ्यात अडकून राहीलेला होता.... आदिती.. प्लीज परत ये ना एकदा....


No comments