अव्ययांचे प्रकार
मराठी व्याकरण अव्ययांचे प्रकार
‘शब्द’ हा वाक्यातील महत्वाचा घटक आहे. कोणत्याही अर्थपूर्ण वर्णसमूहाला
शब्द असे म्हटले जाते. शब्दांचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केले जाते.
शब्द जातींचे सव्यय आणि अव्यय असे दोन मुख्य प्रकार केले जातात. यांनाच
अनुक्रमे विकारी - अविकारी असे म्हटले जाते.
विकारी शब्द :- वाक्यात
उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ शब्दात (रुपात) बदल होत नाही त्या
शब्दांना अव्यय किंवा अविकारी शब्द (बदल न घडणारे) म्हणतात.
नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद या सव्यय किंवा विकारी शब्द जाती मानल्या
जातात. यातील नाम, सर्वनाम व विशेषण यांना विभक्ती, लिंग, वचन व पुरुषाचे
विकार होतात तर क्रियापदांना काळ व अर्थ यांच्या प्रत्ययांनुसार विकार
होतात. मात्र अव्ययांना कोणतेही विकार होत नाहीत. त्यात क्रियाविशेषण,
शब्दयोगी, उभयान्वयी व केवलप्रयोगी या अव्ययांचा समावेश होतो.
यापूर्वी आपण शब्दांच्या विकारी जातींचा व त्यांच्या उपप्रकारांचा अभ्यास केला आहे. आता शब्दांच्या अविकारी जातीचा अभ्यास करू.
क्रियाविशेषण अव्यय :-
ज्या अव्ययांनी क्रियेच्या कोणत्याही प्रकारचे विशिष्टत्व दाखविले जाते, त्यास क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
क्रियाविशेषणाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.- तेथे कर माझे जुळतील.
- तेथून नदी वाहते.
- काल शाळेला सुट्टी होती.
- परमेश्वर सर्वत्र आहे.
- रस्त्यातून जपून चालावे.
- तो वाचताना नेहमी अडखळतो.
- मी अनेकदा बजावले.
शब्दयोगी अव्यय :
जे अव्यय शब्दाला जोडल्याने त्या शब्दाचा इतर दुसऱ्या शब्दाशी असलेला संबंध दाखविला जातो. त्या अव्ययास शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
शब्दयोगी अव्ययाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे -- त्याच्या घरावर कौले आहेत.
- टेबलाखाली पुस्तक पडले.
- सूर्य ढगामागे लपला.
- देवासमोर दिवा लावला.
- शाळेपर्यंत रस्ता आहे.
उभयान्वयी अव्यय :
दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उभयान्वयी अव्ययाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे -- विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.
- आंबा व फणस ही कोकणातील फळे आहेत.
- जनतेची सेवा करा म्हणजे जनता तुम्हास निवडून देईल.
- तो म्हणाला की, मी हरलो.
- वैद्याने चांगले औषध दिले पण उपयोग झाला नाही.
केवलप्रयोगी अव्यय :
जी अव्यय बोलणाऱ्याच्या मनातील हर्ष, शोक, आश्चर्य, तिरस्कार, अनुमोदन इत्यादी भाव किंवा वृत्ती दर्शवितात. त्यांना केवलप्रयोगी अव्यये असे म्हणतात.
केवलप्रयोगी अव्ययाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे -- अय्या ! इकडे कुठे तू ?
- अरेरे ! काय दशा झाली त्याची !
- चूप ! एक शब्द बोलू नको.
- आहा ! किती सुंदर फुले !
Author: सौ. नवले सुनंदा प्रभाकर
School :- संदेश विद्यालय, सूर्यनगर
School :- संदेश विद्यालय, सूर्यनगर
No comments